आमची हैदराबाद सहल...
Posted on April 30, 2025
सौ. वैशाली जाधव
शिक्षिका"बॅग भरो और चलो निकल पडो" हे फक्त म्हणणे सोपे आहे. पण प्रत्यक्षात आणणे मात्र फार अवघड आहे. याची प्रचिती मला यावर्षी इ. ४ थी हैदराबाद सहलीमुळे आली.
मा. मुख्याध्यापिका सौ. कल्पना वाघ बाई यांच्या संकल्पनेतून शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून दि. २४ ते २७ सप्टेंबर २०२४ या दरम्यान ही सहल इ. ४ थी साठी आयोजित करण्यात आली होती.
जुलै महिन्यात पहिली पालक सभा घेऊन पालकांना या सहली विषयी कल्पना देण्यात आली. त्यानंतर पालक , विद्यार्थी व शिक्षक यांची संमती पत्रे, आधार कार्ड, सहल फी इ. सर्व कलेक्शन सुरू झाले. त्याचवेळी शाळा व्यवस्थापन समिती व पालक संघ यांचे ठराव करून घेणे, संस्थेचे पदाधिकारी व शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांची संमती मिळवणे ही सर्व प्रोसेस चालू केली. हे सर्व जोमाने सुरू असताना मनात कुठेतरी भीती डोकावत होती. पण हळूहळू अपेक्षेप्रमाणे मुलांची संख्या वाढू लागली त्यामुळे मनाला हुरूप येऊ लागला होता. शेवटी विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक संघ सदस्य (डॉक्टरांसह) असे सर्व मिळून सहलीसाठी १२५ संख्या फायनल झाली.
पुढील चक्र फिरायला सुरुवात झाली. जातांना इंडिगो फ्लाईट आणि येतांना शताब्दी ट्रेन अशा दोन्ही प्रकारांचा प्रवास होणार होता त्या दृष्टीने श्रद्धा टुरिझमचे श्री. संदीप देशपांडे यांनी बुकिंग प्रोसेस सुरू केली. रेल्वे बुकिंग साठी तर श्री. तळपे सरांनी स्वतः स्टेशनवर जाऊन प्रयत्न केले. त्याचवेळी रेल्वेच्या लॉग बुक मध्ये सर्व १२५ जणांची नावे ३ वेळा कॅपिटल अक्षरात लिहिण्याची अर्जंसी रेल्वे विभागाकडून आली. विज्ञान प्रदर्शनीच्या कामाची माझी गडबड चालू असताना एका रात्रीत ३७५ नावे लिहिण्याची जबाबदारी मी पूर्ण केली.
फायनली बुकिंग झाले. मायक्रो लेव्हलला सर्व गोष्टींचा विचार करून पुन्हा पालक सभा घेऊन बारीक-सारीक सूचना पालकांना, मुलांना व शिक्षकांनाही देण्यात आल्या. या सहली दरम्यान शिक्षक, विद्यार्थी व पालक यांच्या तीन ते चार सभा घेण्यात आल्या. वेगवेगळे पाच व्हाट्सअप ग्रुप करून सर्वांना वेळोवेळी सूचना व्यवस्थित पोहोचवण्यात आल्या. एअरपोर्टचे चेकिंग पासेस, रेल्वे तिकिट्स, सॅटिन रिबीन इ. शिक्षकांना त्यांच्या गटाप्रमाणे ताब्यात दिले. सर्वांच्या सर्व शंकांचे निरसन झाल्याने मन थोडेसे स्थिरावले.
सर्व कागदपत्रांच्या दोन फाईल करण्याचे महत्त्वाचे काम मंडलिक बाईंनी केले होते. त्यातील एक फाईल शाळेचे लेटरहेड, स्टॅम्प पॅड आठवणीने बरोबर घेतले. अखेर नियोजनाप्रमाणे २४ सप्टेंबर ला फ्लाईट चा दीड तासाचा प्रवास करून आमचं नमशा चं वऱ्हाड हैदराबादला पोहोचलं. त्यानंतर हॉटेल रुम्स ताब्यामध्ये घेतल्यावर रोजचे रुटीन सुरू झाले. रोज अंघोळ, नाश्ता, जेवण असं सगळं व्यवस्थित करून चार दिवसांमध्ये लुंबिनी पार्क, हुसेन सागर तलाव ,बुद्धा स्टॅच्यू, लेझर शो, रामोजी फिल्म सिटी, पोचमपल्ली गाव, बिर्ला मंदिर, सालारजंग म्युझियम, चारमिनार, नेहरू झूलॉजिकल पार्क, गोवळकोंडा किल्ला, स्टॅच्यू ऑफ equality ही हैदराबाद मधील सर्व प्रसिद्ध ठिकाणे भरपूर मजा करून आम्हीही मुलांबरोबर पाहिली. यावेळी सर्वांच्या चेहऱ्यावर दिसत होता आनंद आणि फक्त आनंद!!!
सहल पूर्ण करून पुणे स्टेशनला पोहोचल्यावर बाहेर स्वागताला उभे असलेले पालक पाहून खरोखरच केलेल्या कष्टाचे चीज झाल्याने अक्षरशः आनंदाश्रू बाहेर पडले. सहल यशस्वी झाल्यानंतर पालक, संस्थेचे पदाधिकारी, न्यूज पेपर या सर्वांनी अभिनंदनाचा वर्षाव करून पाठीवर कौतुकाची थाप दिली. पुणे, हैदराबाद एअरपोर्ट, रेल्वे स्टेशन, हैदराबाद मधील सर्व ठिकाणी आपल्या मुलांना पाहून मुलांचे, शाळेचे, संस्थेचे कौतुक होत होते.
आयुष्यातील ही पहिली शालेय विमान सहल मुलांच्या कायमस्वरूपी स्मरणात राहील. नुसतीच मज्जा नव्हती तर त्याचबरोबर ज्ञान आणि मनोरंजन यांचा उत्तम मेळ साधला होता. शाळेच्या १२५ वर्षांच्या इतिहासातील घडामोडी मध्ये एक नवीन इतिहासाचे पान जोडले गेले. ही संधी मा. मुख्याध्यापिका वाघ बाईंनी दिली याबद्दल बाईंचे खूप खूप आभार!!! सहलीचे नियोजन करत असताना अनेक नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या. काही बारकावे लक्षात आले. अडचणी समोर उभ्या राहिल्या. अनेक छोटे, मोठे प्रश्न निर्माण झाले. पण यातूनही मार्ग काढून ही सहल यशस्वी करण्यासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा केली. हे सर्व करत असताना प्रसंगी धावपळ, चिडचिड, प्रेशर, टेन्शन हे सर्व सोबतीला होतंच...... पण ईश्वर कृपा, बाईंचे अमूल्य मार्गदर्शन आणि तळपे सरांनी सुरुवातीपासून शेवटपर्यंत सहल विभागाच्या सौ.जाधव बाई व सौ. मंडलिक बाईंना केलेले सहकार्य यामुळे हे सर्व शक्य झाले.
हैदराबाद सहल यशस्वी करण्यामध्ये शाळेतील प्रत्येक घटकाचा नक्कीच खारीचा वाटा आहे. सर्वांच्या सहकार्यामुळेच हैदराबाद सहल सुफळ संपूर्ण झाली.
अशक्य काहीच नसते,
अवघड मात्र नक्कीच असते,
ते प्रयत्नांती सोपे होते,
त्यासाठी हवी चिकाटी, प्रयत्न, सातत्य ,पाठपुरावा आणि सहनशक्ती हे मात्र अगदी अगदी खरं आहे.