श्रीमती हेमा जाधव
मुख्याध्यापिका
नवीन मराठी शाळा माऊली
संस्कारांची असे सावली
क्रीडा, कला गुणांना वाढवी
यश किर्ती उंच अंबरी चढवी
डेक्कन एज्युकेशन सोसायटी संचलित १२६ वर्षाची ऐतिहासिक, वैभवशाली परंपरा लाभलेली नवीन मराठी शाळा, पुणे. ही आपल्या शहरातील नामवंत अशी मराठी माध्यमाची शाळा आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून राष्ट्रभक्तीच्या ध्येयाने प्रेरित होऊन स्थापन झालेल्या न्यू इंग्लिश स्कूलसाठी पोटर स्कूल म्हणून नवीन मराठी शाळा स्थापन करण्यात आली. प्रयोगशीलता व विद्यार्थ्यांचे सर्वांगीण प्रगतीसाठी राबवलेले विविध उपक्रम यामुळे अतिशय कमी काळात शाळेची पटसंख्या प्रचंड वाढू लागली व वाढत्या पटसंखेला जागा अपुरी पडू लागली. सुरुवातीला मोरोबा दादांच्या वाड्यात व नंतर होळकर वाड्यात भरणारी ही शाळा आज उभ्या असलेल्या या वस्तूत स्थलांतरित करण्यात आली. नवीन मराठी शाळेच्या या भव्य दगडी इमारतीचे उद्घाटन १९ मार्च १९२३ रोजी तत्कालीन शिक्षण मंत्री महादेव चौबळ यांच्या हस्ते चांदीच्या किल्लीने कुलूप उघडून करण्यात आले. शंभर वर्षापेक्षा अधिक काळ दिमाखात उभी असणारी ही इमारत, आणि सव्वाशे वर्षापेक्षा अधिक काळ संस्कारक्षम पिढ्या घडविणारी ही शाळा आजतागायत यशस्वी वाटचाल करत आहे. सध्या इंग्रजी माध्यमाकडे वाढलेला कल पाहता अजूनही या स्पर्धेच्या युगात मराठी माध्यमांमध्ये आपले वेगळेपण टिकून ठेवणारी नवीन मराठी शाळा.
"नवीन मराठी, नवीन मराठी शाळा आमची शिस्तीची
शूरवीर होऊ आम्ही, सेवा करू या देशाची"
स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच देशभक्तीचा वसा आणि वारसा लाभलेल्या आणि तो गेली १२६ वर्षे समर्थपणे पुढे नेणाऱ्या डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नवीन मराठी शाळेची ही आरोळी शाळेच्या ध्येय व संस्कारांची साक्ष देते. शाळेत अनेक भौतिक सुविधा आहेत,जसे प्रत्येक वर्गात स्मार्ट टीव्ही आहे. सोलर सिस्टिम, पाण्याची टाकी,शुद्ध पाण्यासाठी कुलर बसवले आहेत. भौतिक सुविधांच्या बरोबरच गुणवत्तापूर्ण शिक्षण व विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व घडवणारे संस्कारही केले जातात.विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी शाळेत अनेक उपक्रम राबविले जातात. शाळेची बाग, बागेतील शेतीकाम,संगणक कक्ष, ओपन जिम, मातीकाम वर्ग, विज्ञान व गणित प्रयोगशाळा, संगीत व चित्रकला वर्ग, आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धा, शिष्यवृत्ती परीक्षा, शाळेने गीत रामायण (१३ डिसेंबर २०१७) व कराटे पंचेस (२७ मार्च २०२५) रोजी केलेला दुहेरी विश्वविक्रम, विविध क्रीडा स्पर्धा व स्पर्धा परीक्षा यात शाळेचे यश ही शाळेची अनेक वैशिष्ट्ये सांगता येतील. माजी विद्यार्थी व सुज्ञ सुजाण पालक तसेच समाजातील दिग्गज व्यक्तिमत्व यांच्याशी योग्य समन्वय साधून विद्यार्थी वर्तन समस्यांवर अभ्यास करून बालकांचे व्यक्तिमत्व अधिक निकोप घडवण्यासाठी शालेय प्रशासन कार्यरत आहे.
शाळेतील सर्व उपक्रमांना विविध समाज माध्यमातून मिळणाऱ्या प्रसिद्धीमुळे मराठी माध्यमाची दर्जेदार शाळा म्हणून शाळेचा नावलौकिक कायम आहे.नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार शिक्षणासाठी कोणतेही मध्यम निवडले तरी मातृभाषेतून शिक्षण देणे अत्यावश्यक आहे आणि इथे मिळणारे शिक्षण हे दर्जेदारच आहे.प्राथमिक शिक्षण यशस्वी जीवनाचा पाया आहे आणि तो अधिक भक्कम करण्यासाठी येथील प्रत्येक घटक झटत आहे. शाळेतील कुशल तज्ञ असे २८ शिक्षक अत्यंत निष्ठेने या आपल्या नवीन मराठीच्या विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी झटत आहेत.
या शाळेमध्ये शिकणारे विद्यार्थी तसेच शिक्षक, पालक खरोखरच भाग्यशाली आहेत. लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर, विष्णुशास्त्री चिपळूणकर, महादेव बल्लाळ नामजोशी, वामन शिवराम आपटे यांच्या राष्ट्रहिताच्या धोरणातून उभारलेली आपली संस्था आणि तिचा अविभाज्य घटक असलेली ही आपली शाळा राष्ट्रहिताने प्रेरित होणारे विद्यार्थी घडवीत आहे.