आमच्याबद्दल
नवीन मराठी शाळा, पुणे मध्ये आपले सहर्ष स्वागत
नवीन मराठी, नवीन मराठी शाळा आमची शिस्तीची ||
शूरवीर होऊ आम्ही, सेवा करू या देशाची ||
स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच देशभक्तीचा वसा आणि वारसा लाभलेल्या आणि तो गेली १२६ वर्षे समर्थपणे पुढे नेणाऱ्या डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नवीन मराठी शाळेची ही आरोळी शाळेच्या ध्येय व संस्कारांची साक्ष देते. राष्ट्रीय शिक्षण देण्याच्या हेतूने लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, गोपाळ गणेश आगरकर, विष्णुशास्त्री चिपळूणकर, महादेव बल्लाळ नामजोशी, वामन शिवराम आपटे या पंचायतनांनी १८८० साली न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली.पुढे १८८४ मध्ये कार्याची व्याप्ती वाढवण्यासाठी डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना झाली. न्यू इंग्लिश स्कूलमध्ये प्रवेश देण्यासाठी विद्यार्थ्यांची उत्तम पूर्वतयारी करून घेण्याच्या दृष्टीने त्याला प्राथमिक शाळेची म्हणजे 'पोटर स्कूल'ची जोड देण्यासाठी नवीन मराठी शाळेची सन १८९९ मध्ये स्थापना झाली.
सुरुवातीला मोरोबा दादांच्या वाड्यात व व नंतर होळकर वाड्यात भरणाऱ्या या शाळेला पटसंख्या वाढल्यामुळे दिवसेंदिवस जागा अपुरी पडू लागली.२५ मार्च १९२३रोजी १८ वर्गखोल्या असणारी आजची भव्य दगडी इमारतीचे उद्घाटन चांदीच्या किल्लीने कुलूप उघडून तत्कालीन शिक्षण मंत्री महादेव चौबळ यांच्या हस्ते करण्यात आले.शाळेच्या इमारतीला शंभर वर्षे पूर्ण आणि शाळेला सव्वाशे वर्षे पूर्ण झाल्यावरही शाळेची यशस्वी वाटचाल आजतागायत सुरू आहे.
४ जानेवारी २०२४ रोजी शाळेचे शतकोत्तर रौप्यमहोत्सव पूर्ण झाला. यानिमित्ताने राबवल्या गेलेल्या विविध उपक्रमातून शाळेत भौतिक सुविधा वाढल्या. जसे
की प्रत्येक वर्गात स्मार्ट टी.व्ही., सोलर सिस्टिम, पाण्याची टाकी,शुद्ध पाण्यासाठी कुलर बसवले आहेत. भौतिक सुविधांच्या बरोबरच योग्य संस्कारही केले जातात.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळेत अनेक उपक्रम राबविले जातात. शाळेची बाग, बागेतील शेतीकाम,संगणक कक्ष, ओपन जिम, मातीकाम वर्ग, विज्ञान व गणित प्रयोगशाळा, संगीत व चित्रकला वर्ग, आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धा, शिष्यवृत्ती परीक्षा, वाचनालय, स्पोकन इंग्लिश, मौखिक संस्कृत ही शाळेची महत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत. शाळेने 'गीत रामायण' (१३ डिसेंबर २०१७) व कराटे पंचेस (२७ मार्च २०२५) रोजी केलेला दुहेरी विश्वविक्रम, विविध क्रीडा स्पर्धा व स्पर्धा परीक्षा यात शाळेचे यश,अशी शाळेची अनेक वैशिष्ट्ये सांगता येतील. माजी विद्यार्थी व सुज्ञ सुजाण पालक तसेच समाजातील दिग्गज व्यक्तिमत्व यांच्याशी योग्य समन्वय साधून विद्यार्थी वर्तन समस्यांवर अभ्यास करून बालकांचे व्यक्तिमत्व अधिक निकोप घडवण्यासाठी शालेय प्रशासन कार्यरत आहे.
शाळेतील सर्व उपक्रमांना विविध समाज माध्यमातून मिळणाऱ्या प्रसिद्धीमुळे मराठी माध्यमाची दर्जेदार शाळा म्हणून शाळेचा नावलौकिक कायम आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार शिक्षणासाठी कोणतेही माध्यम निवडले तरी मातृभाषेतून शिक्षण देणे अत्यावश्यक आहे आणि इथे मिळणारे शिक्षण हे दर्जेदारच आहे.प्राथमिक शिक्षण यशस्वी जीवनाचा पाया आहे आणि तो अधिक भक्कम करण्यासाठी येथील प्रत्येक घटक झटत आहे. इंग्रजी माध्यमाचे वाढते प्राबल्य असतानाच एकीकडे मराठी शाळांना मुले मिळत नाहीत असे आपण ऐकतो मात्र आपल्याकडे प्रवेश द्यायला जागाच शिल्लक रहात नाहीत यातच शाळेची यशस्विता दिसून येते. शाळेतील कुशल तज्ञ असे २९ शिक्षक अत्यंत निष्ठेने या आपल्या नवीन मराठीच्या विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी झटत आहेत.
कला, क्रीडा नैपुण्य, हसत खेळत अभ्यास l
बालकांचा सर्वांगीण विकास, हाच खरा घेऊन ध्यास l
राष्ट्राचे भवितव्य ही बालके यशस्वी होतील हमखास l
नवीन मराठी शाळेचे वैशिष्ट्य हे खास,
नवीन मराठी शाळेचे वैशिष्ट्य हे खास l
उद्दिष्ट
- विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधून उत्तम राष्ट्र घडविण्यामध्ये योग्य अशी मूल्ये विद्यार्थ्यांमध्ये रुजवणे
- बौद्धिक विकास
- संस्कारक्षम मन घडवणे
- भावनिक विकास
- नेतृत्व गुण निर्माण करणे
- सण ,उत्सव,परंपरा याबद्दल जाणीव निर्माण करणे
- कला कौशल्य विकसित करणे
ध्येय
- 125 वर्षापासून माणूस घडवणारी शाळा .
- शिक्षक ,विद्यार्थी ,पालक व संस्था यांच्या सहाय्याने आदर्श विद्यार्थी घडविणे .
- कालानुरूप ज्ञान ,विज्ञान ,तंत्रज्ञानाचा परिचय करून देणे. (सुसज्ज संगणक कक्ष, ई - लर्निंग वर्ग)
- सामाजिकतेची जाणीव मनामध्ये जागृत करणे .
- कृतीयुक्त शिक्षणातून कला ,कौशल्य विकसित करणे.(गणित प्रयोगशाळा)
- शारीरिक विकासासाठी सुसज्ज मैदान व क्रीडा प्रशिक्षणातून सक्षम विद्यार्थी घडविणे .(सुसज्ज मैदान)
- वाचनातून बुद्धीचा व मनाचा विकास साधणे. (सुसज्ज वाचनालय)
आम्ही सर्वोत्तम का आहोत?
उत्कृष्ट शैक्षणिक घटक
शाळेतील अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना आव्हानात्मक बनवण्यासाठी , त्यांच्यामध्ये असलेल्या क्षमतांना प्राप्त करण्याकरिता आणि त्यासाठी प्रेरित करण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आलेला आहे.
अनुभवी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी
शाळेतील प्रत्येक घटक उत्साही, तंत्रस्नेही, उच्चविद्याविभूषित असून प्रत्येक विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासासाठी वचनबद्ध आहेत.
अत्याधुनिक सुविधा
शाळेचा आधुनिक परिसर शिक्षणासाठी पोषक असून विद्यार्थ्यांच्या विकासासाठी परिपूर्ण वातावरण मिळण्यास त्यामुळे मदत होते.