प्रवेश सुरु

१0 वर्ष जर्मनीत राहिल्यानंतर जेव्हा भारतात यायचे ठरले तेव्हा आमचे हेही ठरले होते की, श्रीया ला मराठी माध्यमाच्या शाळेत घालायचे हा आमचा निर्णय आम्ही ज्या कोणाला सांगायचो तो प्रत्येक माणूस आम्ही कसे चुकीचे आहोत हे आम्हाला  सांगायचा. पण आम्ही आमच्या मतावर ठाम होतो कारण मातृभाषेतून विषय पटकन समजतात हे आम्हाला परदेशात राहून जास्त पटलं होत. तिकडे कोणताही जर्मन माणूस आपल्या पाल्याना इंग्रजी माध्यमात घालण्यासाठी  धडपड करत नाही आणि मातृभाषेतून शिक्षण हा आपल्या मुलाचा मुलभूत अधिकार आहे असे आम्हा दोघांचं ठाम मत होते. २०१० साली मी शनिवार पेठेत नोकरीनिमित्त एका होस्टेलला रहात होते.  तिथल्या आमच्या माईंच्या जुळ्या नाती या नवीन मराठी शाळेत जात. त्यांना वर्गशिक्षिका सौ. देव बाई होत्या. त्या दोन चिमुकल्या सतत शाळेबद्दल बाईंबद्दल भरभरुन सांगायच्या. त्यामुळे मला या शाळेबद्दल तिथल्या उपक्रमांबद्दल माहिती झाली. मी शाळेचे फेसबुक पेज सुद्धा फाॅलो केले होते. २०१६ साली शालेतील मुलांनी सादर केलेले गीत रामायण आणि त्याचे वर्ल्ड  रेकॉर्ड हे सर्व भारावून टाकणारे होते. हे पाहून शाळेत अभ्यासासोबतच इतरही गोष्टी तितक्याच मेहनती ने मुलांना शिकवल्या जातात याची खात्री पटली. शाळेत पार पडलेला वारी चा कार्यक्रम पण तेवढाच सुंदर होता हे सर्व पाहून आमचा श्रीया ला नवीन मराठी शाळेत घालण्याचा विचार पक्का झाला. तरीही मनात धाकधूक होतीच कारण हा बदल श्रीया साठी खूप मोठा होता. जर्मनीत किंडरगार्टन मध्ये कसलाही अभ्यास शिकवत नाहीत आणि आपल्याकडे मुलांना किमान अक्षरओळख तरी असते. तिकडे १२ मुलं वर्गात आणि २ बाई असंत आपल्याकडे पट संख्या ६३ आणि बाई एक.
3 ऑगस्ट २० 22 श्रीयाचा शाळेतील पहिला दिवस आम्ही तिला फक्त पाण्याची बाटली सोबत दिली होती कारण २३ तारखेला आम्ही नुकतेच बर्लिनहून पुण्यात आलो होतो.

श्रीयाला वर्गशिक्षिका देव बाईच होत्या. हे पाहून खूप निश्चिंत वाटल. त्यांनीही आम्हाला काही काळजी करू नका मी आहे असा धीर दिला. श्रीया रडलीच तर आम्हाला फोन करा असे सांगितले. आम्ही फोनची वाट पाहून दोन वेळा जाऊन विचारून आलो पण श्रीया एवढी रमली होती की ती वेळ आलीच नाही. वर्गातील सगळ्या मुलांनी तिला  पेन्सिल, रंगपेटी, वही सगळं काही दिलं तिच्याशी मैत्री केली, तिला आपलंस केल. आम्हाला जी काळजी होती, ती पहिल्या दिवशीच मिटली. पुढे कितीतरी महिने श्रीया मुलांसाठी नवीन मुलगीच होती. कोणीही तिच्याशी भांडायचं नाही आणि मदतीला सगळेच तत्पर असत. शेअरींग इज केअरींग हे नुसतं म्हणायचं नसतं तर ते आपल्या मुलांमध्ये भिनवायचं असतं. आणि हे काम नवीन मराठीच्या शिक्षिका करतात. दुपारी श्रीया तिच्या मैत्रिणींसोबत डबा खायची. एकदा तिचा डबा खाली पडून सांडला पण देव बाईनी मला सांगितले की तिच्या मैत्रिणींनी तिला त्यांच्या डब्यातील जेवण दिले उलट डब्यापेक्षा जास्त जेवली श्रीया त्या दिवशी. अशा एकोप्याने रहायला शिकवणाऱ्या शाळेत श्रीया आहे याचा आम्हाला अभिमान वाटतो. अशाप्रकारे श्रीया शाळेत छान रमली होती पण एकच
अडचण होती की तिला अक्षरओळख तेवढी झाली नव्हती. मी तिचा अभ्यास घ्यायचे पण मला तेवढं यश आलं नाही. काही दिवसांनी शाळेत अप्रगत चा तास सुरू झाला. श्रीया न चुकता त्या तासाला जाऊ लागली आणि बघता बघता श्रीया सगळं वाचायला लागली. दोन महिन्याची दरी भरून निघाली. या उपक्रमाबद्दल बाईचे आणि शाळेचे खरच कौतुक करावे तेवढे कमीच.

याशिवाय चेरी ऑन द टॉप म्हणतात तो रोजचाप्रार्थना आणि परिपाठ! जे संस्कार एवढे वर्ष परदेशात असल्याने श्रीया ला मिळाले नव्हते ते सगळे संस्कार तिच्यावर होऊ लागले. ती आवडीने मला घरी सगळं म्हणून दाखवायची.

हिवाळ्यात सहल आणि स्नेहसम्मेलना मुळे आमच्या श्रीयाच्या आनंदात अजून भर पडली. कधीही स्टेज वर न गेलेली श्रीया, तिला देव बाईनी भाग घ्यायला लावला आणि तिने उत्तम सादरीकरण केले आणि त्याचदिवशी मला सांगून टाकलं आई मी दरवर्षी भाग घेणार. स्टेजडेअरींग एवढ्या लवकर तिच्यात येईल अशी आम्हाला आशा नव्हती. पण बाईंनी सांगितले प्रत्येक मुलाला आम्ही प्रोत्साहन देतो. कारण हे गुण आताच विकसित होतात. आम्ही मुलांमध्ये भेद्भाव करत नाही. प्रत्येकाला भाग घेण्याची संधी देतो. हे वाक्य आम्हाला दोघांनाही भारावून टाकणारं होतं.

अशारितीने श्रीया १ली उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाली. आता काळजी होती दुसरी च्या बाई कोण आणि कशा असतील पण पहिल्याच पालक सभेत घडशी बाईना पाहून त्यांचे विचार, शिस्त लावण्याची पद्धत हे ऐकून आम्ही सर्वच पालक  निश्चिंत झालो. नवीन बाई मुलांनाही आवडल्या होत्या.

 शाळेचं वातावरण स्वच्छ व सुरक्षित आहे. झाडांनी वेढलेली कौलारू दगडी बांधकामाची शाळा आपल्याला सुखावते. शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर दिला जातो, तसेच मराठी साहित्य कला आणि संस्कृती यांचा चांगला परिचय दिला जातो. उपक्रमशील शिक्षण पद्धतीमुळे मुलांचा आत्मविश्वास वाढतो शाळेतील सर्वच शिक्षक अत्यंत समर्पित आणि अनुभवी आहेत. आता श्रीया तिसरीतून चौथीत जाईल. आम्ही घेतलेला निर्णय अगदी योग्य आहे. नवीन मराठी शाळा ही शिक्षणासोबतच मूल्य शिक्षण देणारी एक आदर्श शाळा आहे. 

सौ.स्मिता श्रीराम कुलकर्णी (जर्मनी रिटर्न)
सौ.स्मिता श्रीराम कुलकर्णी (जर्मनी रिटर्न)

नवीन मराठी शाळा..... उत्तम शाळेचे उदाहरण 

प्राथमिक शिक्षण मराठीतूनच व्हावे या अट्टहासाने नवीन मराठी शाळेमध्ये मुलीला प्रवेश घेतला आणि आमचा निर्णय योग्य ठरला याचे समाधान वाटले. मातृभाषाप्रेम ,ज्येष्ठांविषयी आदर, राष्ट्रभक्ती, सामाजिक जाणीव ही सर्व  नीतिमूल्ये सहजगत्या मुलांच्या अंगी बाणवणारी शाळा म्हणजे न.म.शा.! उत्तम शिक्षणासोबतच उत्तम माणूस घडवणारी शाळा म्हणजे न.म.शा. मुलांचा सर्वांगीण विकास साधावयाचा असेल तर उत्तम शाळा म्हणजे नवीन मराठी शाळा! 

श्रीमती डॉ. सौम्या कुलकर्णी
श्रीमती डॉ. सौम्या कुलकर्णी

लाभले मुलांस भरारीस पंख

आकाशी झेप घेतील उंच

या वाक्याप्रमाणे मुलांना झेप घेण्यासाठी पंख देणारी शाळा म्हणजे' नवीन मराठी शाळा' मला अजूनही आठवतं पहिलीचा प्रवेश घेण्यासाठी मी जेव्हा शाळेत आले होते तेव्हा आपुलकीने बोलणारे शिक्षक पाहिले व आपले मुल योग्य गुरुंच्या ताब्यात जाणार आहे याची खात्री पटली. आपली संस्कृती ,सण मुलांना कळावे म्हणून ते शाळेत अगदी उत्साहात साजरा केले जातात. या शाळा माऊलीच्या कुशीत मुलं अगदी सुखावून गेली आहेत. त्यांच्या मनात मातृभाषा व देशसेवा यांबद्दल आत्मीयता तयार करण्याचे काम हे आमच्या शिक्षकांनी खूप चांगले केले आहे. तसेच शाळेत होणारे विविध उपक्रम, क्रीडा स्पर्धा, कला स्पर्धा यांमध्ये सर्वांनी भाग घ्यावा यासाठी ते नेहमीच मुलांना प्रोत्साहन देतात. मुलांसोबतच पालकांनाही कौतुकाची थाप देणारी ही पहिली शाळा असेल असं मला वाटतं... 

 जुन्या नव्या विचारांना एकत्र घेऊन तसेच पाल्य व पालकांचा विचार करून आपली शाळा अजून कशी छान होईल याचा विचार करणाऱ्या मुख्याध्यापिका सौ वाघ बाई यांचं विशेष कौतुक करावंसं वाटतं आजच्या या स्पर्धेच्या जगात आपली शाळा मागे पडू नये म्हणून त्या शाळेत अनेक उपक्रम राबवतात. कालचीच गोष्ट माझा मुलगा त्याच्या मामाशी इंग्रजीमध्ये संवाद साधत होता तो सुद्धा चकीत झाला की मराठी शाळेमध्ये इंग्रजी इतकं चांगलं शिकवतात याचं श्रेय फक्त शाळेला जातं. मुलांचा पाया भक्कम करण्याचे काम शिक्षकांनी अगदी उत्तम केलं आहे. चौथीत असतानाच मुलांनी विमानाने प्रवास केला ही आमच्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. 

माझा मुलगा अर्ष त्याचा पहिली ते चौथीचा प्रवास पाहिला की थक्क व्हायला होतं. त्याच्यात झालेले चांगले बदल व मिळवलेले बक्षीसे  यात त्याच्या शिक्षकांचा मोलाचा वाटा आहे. एक गोष्ट अभिमानाने सांगावीशी वाटते ती म्हणजे 125 वर्ष यशस्वी इतिहास असणाऱ्या शाळेत माझा मुलगा शिकतो याचा मला नेहमीच अभिमान असेल तसेच या शाळेच्या सुवर्ण वाटचालीसाठी माझ्या कायमच सदिच्छा राहतील धन्यवाद...|

 

श्रीमती श्रद्धा कालेकर
श्रीमती श्रद्धा कालेकर

नमस्कार मी डॉक्टर सीमा गोवंडे माझे स्वतःचे दहावीपर्यंतचे शिक्षण मराठी माध्यमातूनच झालेले पुढे मेडिकलला त्यामुळे कुठेही नुकसान झाले असे मला वाटत नाही उलट प्रचंड आत्मविश्वासाने मी अभ्यासही करू शकले आणि पेशंट बरोबर रापो  सुद्धा छान डेव्हलप झाला  आणि होमिओपॅथीच्या तसेच मानसशास्त्राचा अभ्यास करताना हे लक्षात आले की मातृभाषेतून शिक्षण मिळाल्यामुळे बुद्धीचा विकास खूप छान पद्धतीने होतो बेसिक कन्सेप्ट सुद्धा छान क्लियर होतात तेव्हाच माझ्या दोन्ही मुलांना मराठी माध्यमातून घालायचे असे ठरवले.

नवीन मराठी शाळेचे नाव ऐकून होते परंतु जेव्हा प्रत्यक्ष शाळेत घातले तेव्हा जे काहीही अनुभव आले ते मला नक्कीच सांगावेसे वाटतात माझ्या दोन्ही मुलांच्या वेळेला त्यांना शिकवायला असलेले शिक्षक इतक्या मायेने कोणी प्रेमाने शिकवत होते वर्गामध्ये विद्यार्थी संख्या 60 असून सुद्धा प्रत्येक विद्यार्थ्याकडे जातीने लक्ष एकदा दोन तासासाठी म्हणून माझी हाऊस म्हणून मी वर्गावर शिकवायला गेले होते परंतु ह्या वयोगटाच्या मुलांना नियंत्रणात ठेवून शिकवण हे खरंच आयसीयू मध्ये काम करण्यापेक्षा अवघड आहे हे माझ्या लक्षात आले आणि मी दुसऱ्याच दिवशी बाईंना साष्टांग नमस्कार केला की इतक्या सर्व मुलांना तुम्ही कसं काय मॅनेज करता शाळेतच इतका छान अभ्यास करून घेतला जातो की वेगळा अभ्यास करून घ्यायची खरंतर गरज पडत नाही शाळेमध्ये इतक्या प्रकारच्या स्पर्धा होतात की त्यामुळे मुलांचा सर्वांगीण विकास होतो या शाळेमध्ये सर्व स्तराची मुले असल्यामुळे मुलांना वास्तविकतेची पण जाणीव निर्माण होते.

या शाळेतील सर्वच शिक्षक अतिशय टॅलेंटेड असून अगदी मनापासून शिकवतात माझ्या दोन्ही मुलांच्या वेळेला वाघ बाई मुख्याध्यापिका म्हणून होत्या त्यांच्या कार्यकाळामध्ये शाळेची जी काही शिस्त अनुभवायला मिळाले ती खरंच विलक्षण होते सातत्याने नवीन नवीन उपक्रम राबवले जातात आणि या सर्व मुलांचा सर्वांगीण विकास कसा होईल याकडे लक्ष दिले जाते आपल्या मुलांचे काही गुण हे आपल्याला माहीत नसतात परंतु शिक्षक देऊळ कोण त्याला खत पाणी घालून ते कला गुण विकसित करतात माझ्या दोन्ही मुलांच्या ओव्हर ऑल डेव्हलपमेंट मध्ये नवीन मराठी शाळेचा सिंहाचा वाटा आहे असं मी म्हणेन.

डॉक्टर सीमा गोवंडे
डॉक्टर सीमा गोवंडे

१. १२५ वर्षांची परंपरा असलेली एकमेव मराठी शाळा.

२. प्रशस्त आणि हवेशीर वर्ग, विद्यार्थ्यांना बसण्यासाठी मोठे बाक. पिण्यासाठी शुद्ध पाण्याची, फिल्टरची सोय.

३. पारंपरिक पद्धतीने फळ्यावर तर आधुनिक पद्धतीने टेलिव्हिजन माध्यम वापरून शिक्षण.

४. अतिशय हुशार, अनुभवी तसेच मनमिळाऊ शिक्षकवृंद. सोबतच मुलांची सतत काळजी घेणारे शिक्षकेतर कर्मचारी ज्यांच्यामुळे मुलांच्या सुरक्षेची १००% हमी.

५. विद्यार्थी, शिक्षक, पालक यांच्यात समन्वय टिकवून ठेवणारा पालक - शिक्षक संघ.

६. विद्यार्थ्यांमधे गणित व विज्ञान विषयांची गोडी निर्माण करणाऱ्या गणित आणि विज्ञान प्रयोगशाळा.

७. स्पोकन इंग्लिश, मौखिक संस्कृत चे अनुभवी तज्ञ शिक्षकांकडून प्रशिक्षण.

८. प्रत्येक विद्यार्थ्याला स्वतः प्रात्यक्षिक करता यावे यासाठी प्रगत संगणक वर्ग.

९. संगीताची, वाद्यांची ओळख करून देणारा सुसज्ज गायन वर्ग.

१०. गॅजेट्सच्या या आधुनिक जगात पुस्तक वाचन हा संस्कार मुलांमधे रुजवणारे प्रशस्त वाचनालय.

११. वैज्ञानिक युगात मुलांची मातीशी नाळ जोडलेली राहावी यासाठी प्रशस्त अशी बाग व मातीकामाचा वर्ग ज्यात बागकाम, मातीकाम हे विषय मुले प्रत्यक्ष शिकतात, अनुभवतात, आनंदाने शेती आणि मातीत रमतात.

१२. स्काऊट गाईड विषयातील प्रशिक्षित शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना कब - बुलबुल चे प्रशिक्षण.

१३. अभ्यासाबरोबरच स्पर्धा, बाह्य परीक्षा यांची तयारी करून घेतली जाते, जेणेकरून मुलांमध्ये सभाधीटपणा वाढतो.

१४. विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी भले मोठे मैदान जिथे शारीरिक शिक्षण, कवायत यांसोबतच लंगडी पासून डॉजबॉल पर्यंत सर्व खेळ घेतले जातात. 

१५. अभ्यास, खेळ, कला अशा विविध अंगांनी हसत खेळत अतिशय सुलभ रीतीने पण शिस्तीत मुलांना दिले जाणारे शिक्षण ज्यातून मुलांची सर्वांगीण प्रगती होते.

डॉ. मृणालिनी भगुरकर – दुसाने
डॉ. मृणालिनी भगुरकर – दुसाने

नमस्कार मी कविता नेरकर -पवार पोलीस अधीक्षक /पोलीस उपायुक्त महाराष्ट् पोलिस.माझा मुलगा जय विनायक पवार हा या वर्षी नवीन मराठी शाळा,पुणे येथे इयत्ता चौथी रायगड वर्गात शिकतो. इयत्ता तिसरी मध्ये अंबाजोगाई येथे शिकत असताना पुण्यातील या शाळेविषयी आम्हाला अंबाजोगाई मध्ये माहिती समजली म्हणून पुढील शिक्षणासाठी आम्ही त्याला पुण्यात पाठवले. पालक म्हणून मला सांगावेसे वाटते की नवीन मराठी ही एक शाळा नसून एक संस्कार वर्ग आहे. शाळेत प्रवेश घेतल्यापासून जय चा सर्वांगीण विकास झाला आहे. फक्त अभ्यासातच नाही तर वक्तृत्व, बागकाम,संवाद कौशल्य, सभाधीटपणा हे नवीन गुण फक्त शाळेमुळे जय मध्ये विकसित झाले आहेत. त्याच्या भविष्याचा पाया नवीन मराठी शाळेमुळे नक्कीच भक्कमपणे रोवला गेला आहे.पालक म्हणून मी शाळेचे खूप आभार मानते.

कविता नेरकर-पवार, अप्पर पोलीस अधीक्षक, जळगाव

कविता नेरकर-पवार
कविता नेरकर-पवार

नवीन मराठी, नवीन मराठी शाळा आमची शिस्तीची... कुश ला कोणत्या शाळेत घालायचे हा यक्ष प्रश्न आमच्या पुढे होता, तेंव्हाच माझ्या बाबांनी ( स्वर्गीय ज्योतिराम कदम ) एका क्षणाचाही विलंब न करता नवीन मराठी शाळेला तोड नाही तिथेच कुश चे नाव घाला असा सल्ला दिला.. रोजच्या वारा प्रमाणे असणारा परिपाठ, प्रार्थना ही तर मुलांसाठी एक पर्वणीच.. आपल्या शाळेचे ब्रीदवाक्य तर अंगात एकदम जोश निर्माण करणारे आणि तेवढेच शिस्तीचे.. 

सुंदर अशा पारंपरिक पद्धतीने वेगवेगळे हिंदू सण साजरे करणे ही तर आपल्या शाळेची संस्कृती.. यातून सहजच नकळत पणे उलगडत जाणारी आपली हिंदु संस्कृती.. विविध आंतर शालेय आणि आंतर वर्गीय स्पर्धामध्ये भाग घेण्यासाठी सर्वच शिक्षकांचे मुलांना असलेले प्रोत्साहन, मग ते लंगडी असो, डॉजबॉल असो किंवा भालबा चे नाटक असो.. नाहीतर समूह गीत स्पर्धा असो.. सगळ्याची तयारी एकदम जमके.. जोरात.. जोरात..शाळेचे स्नेहसंमेलन ही एक सुंदर पर्वणीच.. एकसे बढकर एक कार्यक्रम, त्यासाठी मेहनत घेत असलेले सर्व मेहनती शिक्षक.. सगळेच अप्रतिम..अशी शाळा लाखात एकच असते जी पाचवीच्या शिष्यवृती परीक्षेचा पाया पक्का व्हावा यासाठी चौथी मधेच शिष्यवृत्ती ची कसून तयारी करून घेते..

मुलांच्या सर्वांगीण विकासावर असलेला भर या सर्व गोष्टी मधून कायमच दिसतो.. १२५ वर्षाची परंपरा असलेली आपली ही शाळा, असे उत्तमोत्तम विद्यार्थी घडवण्याची सेवा अविरत करत आहे…. शाळेने आपल्याला कितीतरी हुशार डॉक्टर, खेळाडू, लेखक, समीक्षक, इंजिनर्स आणि सर्वात महत्वाचे उत्तम नागरिक दिले आहेत.. एक मराठी शाळा मुलांना किती सुंदर घडवतेय याचे उत्तम उदाहरण म्हणजे आपली नवीन मराठी शाळा..

श्रीमती कल्याणी केळापुरे
श्रीमती कल्याणी केळापुरे

नवीन मराठी शाळा ,पुणे" शाळा जरी जुनी असली तरी नाविन्याने भरलेली आहे .त्यामुळे नवीन मराठी शाळा हे नाव सार्थ करते !आजच्या काळातही ही शाळा आपलेपणाने ,प्रेमाने आणि मायेने मुलांना सामावून घेते .मुलांच्या शैक्षणिक, शारीरिक आणि मानसिक जडणघडणीसाठी सतत प्रयत्नशील असते. अभ्यासाबरोबरच विविध स्पर्धा ,खेळ, कराटे या गोष्टी मुलांनी शिकाव्या, सहभागी व्हावे यासाठी शाळा सतत प्रयत्नशील असते .शाळेच्या नावावर दोन विश्वविक्रम आहेत याचा आम्हा सर्वांना सार्थ अभिमान आहे !वर्गातील प्रत्येक मुलाला विषय समजावा म्हणून तळमळीने शिकवणारे शिक्षक या शाळेत अजूनही आहेत .शाळेचे मराठी पण जपलेलं आहे, म्हणूनच ही शाळा सगळ्यांनाच म्हणजे मुलांना तर आवडतेच पण त्याचबरोबर पालकांनाही ती आपली वाटते .मराठी शाळांच्या गुणवत्तेवर अनेकांना प्रश्न पडलेले असतात ,अशा लोकांनी जरूर नवीन मराठी शाळेचा अनुभव घ्यावा. रोजचा दिनविशेष, आपले सण, परंपरा, उत्सव यांची माहिती, थोर माणसांचे कार्य आपली मुलं घरी येऊन आपल्याला सांगत असतील तर, यापेक्षा वेगळा आनंद कोणता?मराठी शाळेसाठीचा उत्तम पर्याय म्हणजेच नवीन मराठी शाळा ! शाळेतली मुलं म्हणतात ना,

नवीन मराठी नवीन मराठी शाळा आमची शिस्तीची ,शूरवीर होऊ आम्ही सेवा करूया देशाची!! या उक्ती प्रमाणेच शाळेतून अनेक मुलं घडली आहेत, वेगवेगळ्या पदांवर कार्यरत आहेत, अधिकारी बनलेली आहेत आणि देशाची सेवा करत आहेत.आजही शाळेबद्दल त्या सर्वांना प्रेम आहे ,आपुलकी आहे .हे या शाळेची  महती सांगण्यासाठी अगदी पुरेसे आहे..... शेवटी शाळा म्हणजे माय माऊली, त्या माऊलीची उब या शाळेत नक्कीच आहे......!

डॉ. सोनाली घाटणेकर
डॉ. सोनाली घाटणेकर

नवीन मराठी शाळा म्हणजे शिक्षण, संस्कार आणि मातृभाषेचा अभिमान यांचा सुंदर संगम आहे.इथे शिकताना मराठीची गोडी आणि आधुनिकतेची जाण एकत्र अनुभवायला मिळते. "नवीन मराठी शाळा" ही केवळ शिक्षणसंस्था नसून, ती एक संस्कारकेंद्र आहे. मराठी भाषेचा अभिमान जपत आधुनिक तंत्रज्ञानाशी सुसंगत शिक्षण देणारी ही शाळा विद्यार्थ्यांसाठी खरंच आशीर्वाद ठरते. येथे मिळणारे शिक्षण केवळ पुस्तकी नसून ते जीवनाला दिशा देणारे आहे. शिक्षकांचे मार्गदर्शन, मराठी संस्कृतीची जपणूक आणि विद्यार्थ्यांना आत्मविश्वास देणारे वातावरण – हे सर्व या शाळेचं खास वैशिष्ट्य आहे. अशी शाळा म्हणजे आपल्या मातृभाषेच्या उज्ज्वल भविष्याची पहिली पायरीच आहे.

श्री. प्रणव जोशी
श्री. प्रणव जोशी

प्रत्येक पालकाचं एक स्वप्न असतं की, आपल्या पाल्याला उत्तम शिक्षण मिळावं. मी आणि उत्कर्षा या बाबतीत अत्यंत भाग्यवान आहोत. आदर्श मूल्यांचा आणि विचारांचा वारसा लाभलेल्या नवीन मराठी शाळेत नभाला शिक्षण घेण्याची संधी मिळत आहे ही आमच्यासाठी खरोखरच भाग्याची गोष्ट आहे. आमची मुलगी नभा आत्ता चौथ्या इयत्तेत शिकत असून गेल्या चार वर्षांत तिच्यामध्ये कमालीची प्रगती झालेली आम्हांला दिसत आहे. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. कल्पना वाघ बाई यांचा अत्यंत शिस्तशीर आणि तितकाच प्रेमळ स्वभाव विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांसाठी एक आदर्श वस्तुपाठच आहे. अभ्यासाबरोबरच कला, क्रीडा आणि इतर अनेक विविध उपक्रमांमध्ये, स्पर्धांमध्ये एकही विद्यार्थी मागे पडू नये यासाठी सर्वच शिक्षक जिवापाड मेहनत घेत आहेत. प्रत्येक विद्यार्थ्यातील गुण हेरुन त्याला प्रोत्साहन देत आहेत. उत्तम संस्कारांनी मुलांच्या आयुष्याची पायाभरणी करत त्यांना घडवण्याचं अमूल्य कार्य सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि शाळामाऊली अविरतपणे करत आहे. या आदर्श संस्कारांची शिदोरी सर्व मुलांना आयुष्यभर उपयोगी पडेल याची आम्हांला खात्री आहे. पुढची पिढी उत्तमरित्या घडावी या एकाच व्रताने ज्ञानदानासाठी वाहून घेतलेल्या नवीन मराठी शाळेला शतशः वंदन! 

श्री. वलय मुळगुंद
श्री. वलय मुळगुंद